जालना : शहरात नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा वाजेच्या सुमारास जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दीडशेच्या वर गोळ्या जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली.
आमदार कैलास गोरंटयाल यांनी बुधवारी नशेच्या गोळ्या अवैधरित्या विकणारी टोळी छत्रपती संभाजीनगरसह अन्य ठिकाणी सक्रिय असल्याची माहिती विधानसभेत दिली होती. या पार्श्वभूमीवर जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या पथकाने माहिती काढली असता, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दोघेजण नशेच्या गोळ्या विकत असल्याचे समजले. यावरून सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय विकता येत नसतांनाही एमआरपीपेक्षा जास्त दराने ते दोघे विकत होते. या कारवाईसाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.