लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मैत्रेय गुंतवणूक प्रकरणातील गुन्ह्यात अटक असलेल्या दोन संशयितांना सदर बाजार पोलिसांनी नाशिक कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. लक्ष्मीकांत श्रीकृृष्ण नार्वेकर (५० रा. रमेदी वसई, ता. वसई, जि. पालघर) विजय शंकर तावरे (४९,रा. विरार, ता. वसई. जि. पालघर) असे संशयित आरोपींची नावे आहेत.मैत्रेय कंपनीने गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशाचा कमी कालावधीत जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून राज्यातील हजारो गुंतवणूक दारांची फसवणूक केली. जालना जिल्ह्यात अशा गुंतवणूकदारांची संख्या वीस हजारांपर्यंत असून, या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. राज्यात अशाच प्रकारचे गुन्हे ठिकठिकाणी झाल्यामुळे केंद्रीय स्तरावर नाशिक आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच राज्यभरातील गुतंवणूक दारांचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल आदी माहिती एकत्रित करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील वीस हजार गुंतवणूकदारांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. दरम्यान, सदर गुन्ह्याच्या तपासात नाशिक कारागृहात असलेल्या दोघांना सहायक निरीक्षक एस. एस. देवकर यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले आहे.
मैत्रेय गुंतवणूक प्रकरणातील दोन संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:01 AM