जालना : धावडा (ता. भोकरदन) येथील एका किराणा दुकानासमोर उभी असलेली जीप चोरून नेणाऱ्या संशयित चोरट्यांना पारध पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले आहे. शेख वसीम शेख हबीब (३४, रा. नांदुरा, जि. बुलडाणा), शेख मतीन शेख कदीर (रा. गणवाडी रोड, मलकापूर, जि. बुलडाणा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
धावडा येथील किराणा व्यापारी मधुकर छगनअप्पा घोडकी (५८) यांच्या धावडा बसस्थानकाजवळ असलेल्या किराणा दुकानासमोरून चोरट्यांनी ३ ऑगस्टच्या रात्री एक लाख २५ हजार रुपये किमतीची बोलेरो कार चोरून नेली होती. या प्रकरणी घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर कार संशयित शेख वसीम शेख हबीब, शेख मतीन शेख कदीर यांनी चोरल्याची माहिती पारध ठाण्याचे सहायक निरीक्षक शिवाजी नागवे यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पारध पोलिसांनी मलकापूर येथे जाऊन दोघा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, इतर साथीदारांसह कार चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. संशयितांना भोकरदन न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, चोरीस गेलेल्या कारसह संशयितांच्या अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पारध ठाण्याचे सहायक निरीक्षक शिवाजी नागवे, जीवन भालके, नितेश खरात, सुरेश पडोळे, दिनेश पायघन, अनुराज वाठोरे यांनी केली आहे.