जालना : शहरात २४ जानेवारी रोजी होणाऱ्या ओबीसी समाज विशाल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात आलेल्या या दुचाकी रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, या प्रमुख मागणीसह इतर समस्या, मागण्यांकडे राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जालना येथे ओबीसी मोर्चा संयोजन समितीच्यावतीने २४ जानेवारी रोजी विशाल ओबीसी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी ओबीसी मोर्चाच्या वतीने बुधवारी सकाळी जुना जालना भागातील छत्रपती संभाजी महाराज, मोतीबाग उद्यानापासून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. प्रारंभी ओबीसी मोर्चा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ केला. ही दुचाकी रॅली कचेरी रोड, शनी मंदिर चौक, गांधी चमन, देहेंडकर वाडी, लक्कडकोट, बसस्थानक रोड, देऊळगावराजा रोड, रहिमानगंज, आर. पी. रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गुरुबच्चन चौक, रामनगर या मार्गे जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पाणीवेस, काद्राबाद, गरीब शहा बाजार, ममादेवी मंदिर, रेल्वेस्थानक मार्ग, उड्डाणपूल, नूतन वसाहतमार्गे अंबड चौफुलीजवळील प्रांगणात या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी संयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
घोषणांनी दणाणले शहर
या रॅलीत सहभागी युवकांनी ‘उठ ओबीसी जागा हो, परिवर्तनाचा धागा हो, एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे’ आदी घोषणा दिल्या. या घोषणांनी अवघे शहर दणाणून गेले होते. (फोटो)