स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जालना : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी ताब्यात घेतले. संतोष भास्कर जाधव (रा.पळसखेड पिंपळे, हमु.बाग पिंपळगाव ता.गेवराई) असे संशयित आरोपीचे नाव आहेत. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
सराईत गुन्हेगार संतोष जाधव हा भोकरदन रोडने जालना शहरात चोरी केलेल्या दुचाकीने येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून गुरुवारी सांयकाळी साडेसात वाजता भोकरदन चौफुली येथे सापळा रचून संतोष जाधव (वय २२) यास ताब्यात घेतले. त्याला अधिक विचारपूस केली असता, त्याने दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.सुभाष भुजंग, सपोनि शिवाजी नागवे, पोलीस हवालदार प्रशांत देशमुख, किशोर एडके, सॅम्युअल कांबळे, पोलीस नाईक गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे यांनी केली.