मुंबई/जालना - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, हवेत गोळीबारही केला. त्यामुळे राज्यभरातील वातावरण तापलेले असून या आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांची पावले जालन्याकडे वळत आहेत. सकाळीच छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर, खासदार उदयनराजे भोसले यांनीही जालन्यातील आंदोलनस्थळी भेट दिली. जालन्यातील आंदोलनठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने तेथे मोठा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
जालन्यातील प्रमुख आंदोलक मनोज जरांगे यांनी घडलेली घटना आणि आंदोलनाची पार्श्वभूमी उदयनराजेंना सांगितली. त्यावेळी,मंडपासमोर मोठ्या संख्यने समजातील लोक एकत्र आले होते. लोकांकडून झालेल्या घटनेचा संताप व्यक्त करण्यात येत होता. आंदोलक जरांगे यांनी घडलेला प्रसंग उदयनराजेंना सांगितलं. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या चर्चेचीही माहिती दिली. तसेच, आमच्यावरील गुन्हे वापस घेतले पाहिजेत ही आमची मागणी असल्याचंही उदयनराजेंनी म्हटलं. त्यानंतर, उदयनराजेंच्या हातात माईक दिला. मात्र, तितक्यात आंदोलनस्थळी शरद पवारांची एंट्री झाली. आंदोलनस्थळी शरद पवारांची एंट्री होताच, आंदोलकांनी जल्लोष सुरु केला. आंदोलकांचा गोंधळ ऐकून जरांगे यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं. शरद पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार राजेश टोपेही हेही उपस्थित होते. तर, उदयनराजेही स्टेजवर बसले होते.
शरद पवार मुंबईहून जालन्याला जाण्यासाठी रवाना झाले. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील जालन्याला येत आहेत. दरम्यान, शरद पवारांनी जालन्यात आल्यानंतर अगोदर रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेतली. अंबड येथील रुग्णालयात जखमींवरील उपचाराची आणि प्रकृतीची विचारपूस केली.