मुंबई - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, हवेत गोळीबारही केला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून सर्वत्र मराठा समाजातील बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर, आता आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांची पावले जालन्याकडे वळाली आहेत. संभाजीराजे, उदयनराजे, शरद पवार यांच्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. तेथूनच त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला.
उद्धव ठाकरेंनीआंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं. केंद्र सरकारने दिल्ली सरकारविरुद्ध वटहुकून काढला होता. सर्वोच्च न्यायालयाने तो चुकीचा असल्याचं म्हटल्यानंतरही बहुमताच्या जोरावर विधेयक पारित केलं. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, मराठा आंदोलकांच्या केसाला धक्का लागला तरी... असे म्हणत सरकारला इशाराही दिला.
मराठा समाजाच्या मागणी काही नव्याने आल्या नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये समाजाचा आदर ठेवून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लाठीचार्ज झाला नव्हता. लढा सुरू असताना आझाद मैदानावर उपोषण केलं गेलं होतं. मुख्यमंत्री या नात्याने व्हिडीओ कान्फरन्सिंगने चर्चा केली होती, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
मी आणि अशोक चव्हाण आज कुणीही नाहीत. आम्ही माणुसकीच्या नात्याने आंदोलकांना भेटायला आलो आहोत. मराठा समाज शांतताप्रिय आहे. जालन्यातील आंदोलकांच्या केसाला धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून इथं उभा करेन, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी, त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक गोळी दाखवली. या डुप्लिकेट गोळ्या पोलिसांनी मारल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी यावेळी केला.