लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरूच आहे. मंगळवारी नूतन वसाहत, नागेवाडी, चंदनझिरा परिसरातील रहदारीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे पाडण्यात आली.जालना शहरातील एकूण १०९ धार्मिक स्थळांची अतिक्रमणे काढण्यात येणार असून, आतापर्यंत सुमारे ७० ठिकाणांवरील अतिक्रमणे नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाईत हटविली आहेत. मंगळवारी सकाळी दोन पथकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात केली.एका पथकाने नूतन वसाहत भागात उड्डाणपुलाच्या खालील बाजूस असणारे वेताळबाबा मंदिर हटविण्यात आले.तब्बल दोन तास चाललेल्या या कारवाईत मंदिराला लागून असलेली काही अतिक्रमणेही हटविण्यात आली.तसेच परिसरातील फेरीवाल्यांनाही पालिकेच्या पथकाने आपली दुकाने हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे नेहमी गर्दी असणारा हा रस्ता दिवसभर मोकळा दिसत होता. पालिकेच्या दुसºया पथकाने प्रभाग क्रमांक एकचा भाग असलेल्या नागेवाडी परिसरात केलेल्या कारवाईत मोहटादेवी मंदिर, म्हसोबा मंदिर, महादेव मंदिर या तीन धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्यात आली.चंदनझिरा परिसरात जालना-औरंगाबाद मार्गावरील दर्गा, सुंदरनगर भागातील महादेव मंदिर, ढवळेश्वर परिसरातील हनुमान मंदिर, तसेच भोकरदन नाका परिसरातील हनुमान मंदिर दिवसभराच्या कारवाईत हटविण्यात आले.ही अतिक्रमणे हटविताना स्थानिक नागरिक मोठी गर्दी करीत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.
जालन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे हटाव मोहीम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:29 AM