कोतवाल संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन
घनसावंगी : राज्यातील कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, या मागणीचे निवेदन कोतवाल संघटनेच्या वतीने पालकमंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले. या निवेदनावर पांडुरंग गिरे, तुकाराम सवळे, सुनील ठाकरे, अनिल बरडे, अमोल काकडे, अशोक शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
श्रावण महिन्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम
घनसावंगी : येथील विठ्ठल मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त सोमवारपासून धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. सोमवारी कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. दररोज गावातून सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत दिंडी प्रदक्षिणा काढली जाते.
मॉडेल कॉलेजच्या उपक्रमांचा आढावा
घनसावंगी : मॉडेल कॉलेज येथे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी नुकतीच भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतला. प्राचार्य विश्वास कदम यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. यानिमित्त प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. कन्नूलाल विटोरे, डॉ. बाबासाहेब सोनवणे, प्रा. डॉ. भीमराव पुडगे, प्रा. ज्ञानेश्वर खोजे, प्रा. खंडू नवखंडे, प्रा. उदय पवार, डॉ. ऋषी बाबा शिंदे आदींची उपस्थिती होती.
अंबड येथे पथदिवे बसविण्याचे काम सुरू
अंबड : शहरातील विविध भागात खांबासह पथदिवे बसविण्याच्या कामास मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. याबाबत पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यामुळे आता शहरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अफरोज पठाण यांनी सांगितले आहे.
मानधनात वाढ करण्याची मागणी
घनसावंगी : जिल्ह्यातील सर्व निवडणूक विभागातील कंत्राटी ऑपरेटर यांच्या मानधनात वाढ करावी, तसेच थकीत मानधन द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर अमोल गिरी, विठ्ठल कथले, कृष्णा तळेकर, एकनाथ चव्हाण, गौतम गवई, बाळू शिनगारे, बाळासाहेब खारवणे, प्रमोद कांबळे, ऋचा कुलकर्णी, कैलास पिठोरे, प्रवीण सोनवणे, रूपये हुंडिवाले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जाफराबादेतील केंद्रांवर प्रवेशपूर्व परीक्षा सुरळीत
जाफराबाद : जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी वर्ग प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा येथील तीन केंद्रांवर बुधवारी सुरळीत पार पडली. जाफराबाद शहरातील ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय, न्यू हायस्कूल आणि जिल्हा परिषद प्रशाला केंद्रात ६९९ विद्यार्थ्यांपैकी ६२५ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ. सतीश सातव यांनी केंद्रांची पाहणी केली.