वडीगोद्री : अवकाळी पावसामुळे शेतांमध्ये राबणाऱ्या आणि तिथेच राहणाऱ्या ऊसतोड मजुरांना तर मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. वडीगोद्री येथे गावात मजुरांच्या झोपड्यांध्ये पाणी शिरले आहे. घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. उदरनिर्वाह चालवण्यासाठी परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांवर आता अस्मानी संकट कोसळले आहे.
वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत ऊसतोड कामगार पालात आपल्या मुला-बाळांसह झोपलेले असताना रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. काही क्षणात निवारा असलेला पाल उडून गेला. यामुळे ऊसतोड कामगारांचा संसार पूर्णपणे भिजल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे ऊसतोड कामगार महिला-पुरुषासह मुलांची तारांबळ उडाली होती.
या पावसात सर्वच संसार भिजला. पीठही भिजले, मीठही भिजले. अंगावरील कपडे, घालायचे कपडेही भिजले. अंथरूयही भिजले. आता आमची नुकसान भरपाई कोण देणार, असा प्रश्न ऊसतोड कामगारांना पडला आहे. ऊसतोड मजुरांना या अवकाळी पावसाचा फटका बसत असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांसह जनावरांचे हाल होत आहेत.
साखर कारखान्यांचा हंगाम सध्या सुरू आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात राज्यातील विविध जिल्ह्यांतील मजूर ऊसतोडीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यांच्यामार्फत सध्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. वातावरणातील बदलामुळे वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे सर्वच साहित्य भिजले होते. यामुळे भिजलेले कपडे, अंथरूण, धान्य वाळू घालावे लागले.
चांगलीच तारांबळ झालीअचानक पाऊस आल्याने आमची रात्री धावपळ झाली. पाऊस जास्त आल्याने आम्ही बाजूला असलेल्या गोडाऊनमध्ये आसरा घेतला होता. रोजचे कपडे व पाल भिजले होते. यामुळे चांगलीच तारांबळ झाली.- भाऊसाहेब पवार, ऊसतोड मजूर, वाघाळे, जि. नाशिक.
नुकसानीसाठी मदत करावीअचानक झालेल्या पावसामुळे सर्व संसार भिजला. पाल ही उडून गेला आहे. शासन आम्हाला मदत करत नाही. मात्र, यंदा शासनाने अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीसाठी मदत करावी.- रेखा थोरात, ऊसतोड मजूर, शिऊर बंगला, छत्रपती संभाजीनगर.