जालना : तीर्थपुरी येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने काम सुरू होऊ शकले नव्हते. अखेर शासनाने उपजिल्हा रुग्णालयासाठी १९ कोटी ९८ लाखांच्या निधीस मान्यता दिली आहे. २६ जुलै रोजी या संबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळे तीर्थपुरी येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तीर्थपुरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. या आरोग्य केंद्रावर आसपासच्या अनेक गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. येथे अपुऱ्या सुविधा असल्याने अपघात किंवा इतर आजाराच्या रुग्णांना खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. आरोग्य केंद्रावर रुग्णांची संख्या विचारात घेता येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याची मागणी पुढे आली. मागील वर्षी ३० मे रोजी तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून येथे पन्नास खाटाचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. तीर्थपुरी येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाठपुरावा केला होता.
निधीस मंजुरीमागील वर्षी तीर्थपुरीतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती. तत्कालीन सरकारने उपजिल्हा रुग्णालयाचा आराखडा तयार करण्यासाठी सार्वजिक बांधकाम विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. बांधकाम विभागाच्या उच्चस्तरीय समितीने प्रस्ताव मान्य करून सरकारकडे पाठवला. यानंतर सरकारने उपजिल्हा रुग्णालयासाठी निधीस मंजुरी दिली असून १९ कोटी ९८ लाखाच्या अंदाजित खर्च अपेक्षित आहे. या संबंधीचा शासन निर्णय २६ जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे तीर्थपुरी येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंकुशनगरवासीयांना प्रतीक्षा३० मे २०२२ रोजी अंबड तालुक्यातील महाकाळा अंकुशनगर येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासदेखील तत्कालीन राज्य सरकारने मान्यता दिली होती; परंतु, येथील उपजिल्हा रुग्णालयास सध्याच्या सरकारने निधीची तरतूद केलेली नाही.