लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज वितरण कंपनीकडून आता पर्यायी स्त्रांतांचा म्हणजे पवन, सौर उर्जा निर्मितीला प्राधान्य देऊन राज्यातील वीज ग्राहकांना २४ तास योग्य दाबाने अविरत वीजपुरवठा करण्यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या आहेत. भविष्यातही या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर करून वीज निर्मितीचा खर्च कमी करून पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद सरकारकडून केली असल्याची माहिती महावितरण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी बुधवारी येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात वीजेची मागणी थेट २५००० मॅगावॅटवर पोहचली होती. यापूर्वी २०१७ मध्ये ही मागणी उंचावली होती. महाराष्ट्रात आज घडीला ५००० मॅगावॅटचे प्रकल्प पूर्णत्वास जाणे शिल्लक असल्याची खंत यावेळी पाठक यांनी केली. राज्याच्या इतर विभागाच्या विकासाच्या बाबतील समतोतल पाहता मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना दोन वर्षापूर्वी जाहीर केलेली एक हजार कोटीची सवलत पुढेही सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान सौरउर्जेला वीजवितरण कंपनीकडून प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राळेगण सिध्दी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे पथदर्शी प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातून केवळ दोन रूपये ८५ पैसे युनिट दराने वीज मिळणार असल्याचे ते म्हणाले. सौर अटल बिहारी योजना सुरू असून, सहा हजार कृषीपंप दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महावितरण कंपनीच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या उद्योजकांपेक्षा आमच्या प्रकल्पांना ग्राहक प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले.
पर्यायी स्त्रोतांचा वापर करून मुबलक वीजपुरवठा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:44 AM