जालना : येथील औद्योगिक वसाहतीमधील आयकॉन स्टील उद्योग समूह सातत्याने सामाजिक तसेच आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे उपक्रम राबवत असतो. देश जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटांचा सामना करत आहे. या कोरोना संकटावर यशस्विपणे मात करण्यासाठी जालना स्टील उद्योगनगरीतील आयकॉन स्टील उद्योग समूहाने पुढाकार घेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या लसीकरण मोहिमेत जवळपास ५०० कर्मचाऱ्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण करण्यात आले.
या लसीकरण कार्यक्रमाप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी, जगदीश राठी, श्रीनंदन राठी, अनिल सोनी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना संकटकाळात येथील कामगार, कर्मचारी वर्गाने मोलाचे योगदान दिल आहे. आपले कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबाला कोरोनापासून संरक्षण मिळावे यासाठी कंपनी व्यवस्थापनाने संपूर्ण कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम हाती घेतला असून, तो प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. येथे कार्यरत असलेले कामगार, सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले. एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या इतर कामगारांनादेखील यावेळी मोफत लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेला सर्व कामगारवर्गातून भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी आरोग्य विभागाच्या एम. डी. बनसोडे, सहशिक्षक गजानन पत्ते, पी.एस. घोरपडे, सी.के. वाहुळ, आशा वर्कर ए.एस. घाटेकर, आर.ए. कोकने, वैशाली उमक आदींची उपस्थिती होती. हा लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने परिश्रम घेतले.