जालना : तालुक्यातील पाच केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोनाची लस दिली जात आहे. पहिल्याच दिवशीच ५२९ जणांनी लस घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी शीतल सोनी यांनी दिली आहे.
शासनाने ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. जालना तालुक्यात पाच केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्र विरेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र सेवली, डॉक्टर वेद प्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालय आंबेवाडी, पाणीवेस येथील आरोग्य उपकेंद्र व जिल्हा रूग्णालयांचा समावेश आहे. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पाच केंद्रांवर आतापर्यंत ५२९ जणांनी लस घेतलेली आहे. यात विरेगाव केंद्रात १०५, सेवली येथे ८०, प्रकाश आयुर्वेद महाविद्यालय आंबेवाडी ६० व पाणीवेस येथे ७२ तसेच जिल्हा रूग्णालयात २१२ नागरिकांनी लस घेतली आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी शीतल सोनी म्हणाल्या की, आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर यांनी केंद्रांवर जाऊन लसीकरण करावे. जिल्ह्यामध्ये एकूण १६ ठिकाणी लसीकरण केंद्र असली तरीही यापैकी आठ लसीकरण केंद्र केवळ जालना तालुक्यात आहे. ज्यामध्ये पाच केंद्रांवर मोफत लसीकरण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.