भोकरदन : शहरातील शासकीय निवासी मुलांच्या वसतिगृहात शनिवारी कोरोना लसीकरणास उत्साहात प्रारंभ झाला. डॉ. चंद्रकांत साबळे यांना प्रारंभी कोरोनाची लस देण्यात आली.
उपविभागीय अधिकारी अंजली कानडे यांच्या हस्ते फित कापून या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. शासकीय सूचनेनुसार आयोजित लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शंभर जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. भोकरदन शहरात एकूण ३०६ जणांना ही लस देण्यात येणार आहे. भोकरदन शहरातील डॉ. चंद्रकांत साबळे यांना प्रथम लस देऊन लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील सीमा जाधव यांना लस देण्यात आली.
लसीकरणानंतर कर्मचाऱ्यांना अर्ध्या तासासाठी निरीक्षण खोलीमध्ये ठेवण्यात आले होते. लस दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना काही त्रास होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली जात होती. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी आर. एम. चंदेल, डॉ. अमोल मुळे, दीपक सोनी, मंडळ अधिकारी पी. जी. काळे, तलाठी कल्याण माने, सुनील दळवी, ग्रामीण रुग्णालयातील डी. एम. मोतीपवळे, तालुका आरोग्य अधिकारी रघुवीर चंदेल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मुळे, दीपक सोनी, हर्षल महाजन, नाजमीन देशमुख, वसीम सय्यद, अण्णा सुरासे, शाहिद देशमुख, तृप्ती निलंक, प्रणाली मिरकड, नारायण चोबे, गणेश नाथ जोगी, मयूर थारेवाल, संदीप शिंदे, परिचारिका सीमा जाधव, कावेरी गवळी, शीतल वानखेडे, सविता वानखेडे, दीपाली सुरसे, सिंधू फोलाने, बाबूराव वाघमोडे, एस. बी. तुपे आदींची उपस्थिती होती.
सर्वांनी लस घ्यावी
लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या सर्वांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शंभर जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी ज्यांना लस दिली त्यांना कोणताही त्रास झालेला नाही. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी लस घ्यावी.
डॉ. दयानंद मोतीपवळे
वैद्यकीय अधीक्षक, भोकरदन.