राणीउंचेगाव : मुलींनी आज सर्वच क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेले आहे, असे असतानाही, घरांमध्ये मुलगी झाल्यास फारसा आनंद होत नाही, शहरासह ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. स्त्री जन्माचे स्वागत व्हावे, मुलीच्या जन्मानंतरही तिच्याकडे लक्ष्मी म्हणून पाहिले जावे, या उद्देशाने घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुलीचा जन्म झाल्यास तिच्या नावे १८ वर्षांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत ५ हजार रुपये डिपॉझिट ठेवण्यात येणार आहेत.
राणीउंचेगाव गावची लोकसंख्या ९ हजार ७७७ आहे. गावामधील मुला-मुलींचा जन्मदरात समानता असावी, भविष्यामध्ये मुलीचा जन्मदर कमी होऊ नये, या उद्देशाने नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व महिला सदस्यांनी या सभेत ठराव मांडला होता, त्यास उपसंरपच जावेद कुरेशी यांनी अनुमोदन दिले. गावात मुलीच्या जन्मानंतर प्रोत्साहन म्हणून मुलीच्या नावावर ५ हजार रुपये १८ वर्षांसाठी डिपाॅझिट करण्यात येणार आहेत. मुलीच्या जन्मानंतर प्रोत्साहन म्हणून शासनही विविध योजना राबवते. राणीउंचेगाव ग्रामपंचायतीनेही स्वतंत्रपणे ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अठरा वर्षांनंतर मुलीला हे पैसे मिळतील. तिच्या शिक्षणासाठी हे पैसे कामी येतील. त्यामुळे ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राणीउंचेगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत राणीउंचेगाव, कृष्णनगर, निपाणी पिंपळगाव, रवना व दर्गा या पाच गावांचा समावेश आहे. उपकेंद्रात जुलै २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीमध्ये जन्मलेल्या मुलीची संख्या ७६ आहे, तर मुलांची संख्या १०५ आहे. राणीउंचेगाव या गावामध्ये मागील वर्षामध्ये ४४ मुली तर ५१ मुले जन्मल्याची नोंद आरोग्य विभागात असल्याचे राणीउंचेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी केशव नाटकर यांनी सांगितले.
मुलीचा जन्मदर वाढेलगावामध्ये मुलीच्या जन्मदराची सरासरी योग्य प्रमाणात राहावी. मुलीला तिच्या भविष्यामध्ये आर्थिक सहकार्य व्हावे, या भूमिकेतून हा उपक्रम ग्रामपंचायत राबवणार आहे. या उपक्रमामुळे नक्कीच मुलीचा जन्मदर वाढेल.-रत्ना शिंदे, सरपंच, राणीउंचेगाव
शिक्षणासाठी आर्थिक हातभारमुलीच्या जन्मानंतर सर्वसाधारण कुटुंबामध्ये आर्थिक संकटाची चिंता निर्माण होते. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमामुळे मुलीच्या जन्मानंतर सकारात्मक विचार पुढे येतील. मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लागेल.-गीता माने, ग्रामस्थ राणीउंचेगाव.