लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून लोकशाहीचे भविष्यातील जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक घडविण्याचे काम या शाळांमध्ये सुरू आहे. सुप्तपणे सुरू असलेल्या या कार्यातून जिल्हा परिषदेचे, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांचे शिक्षक भविष्यात मोठी क्रांती घडवून आणतील, असा विश्वास जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी व्यक्त केला.जालना येथे आयोजित एक दिवसीय मूल्यवर्धन जिल्हा मेळवा व तीन दिवसीय पोस्टर प्रदर्शनाबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुथ्था म्हणाले, बदलत्या वातावरणाचा परिणाम बाल मनावर होत असून, त्यांच्या विचारांमध्येही बदल होत आहे. त्यामुळे २००३ पासून मुथ्था फाऊंडेशनच्या वतीने मूल्यवर्धन उपक्रमाची आखणी सुरू करण्यात आली होती.जालना येथे मूल्यवर्धन उपक्रमाची माहिती आणि विद्यार्थी, शिक्षकांनी तयार केलेल्या पोस्टरचे प्रदर्शन भरविण्यात आले आहेत. राज्यातील बहुतांश शाळांमधील शिक्षक, विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर येथे ठेवण्यात आले आहेत.
मूल्यवर्धन उपक्रमातून क्रांती होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 1:05 AM