जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून जालना ते मुंबई ही वंदे भारत रेल्वे ३० डिसेंबरपासून धावणार आहे. तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवी झेंडी दाखविणार आहे. यासाठी गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मनमाड स्टेशनपासून ते जालना स्थानकापर्यंत चाचणी घेण्यात आली असून, ती चाचणी यशस्वी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोठ्या प्रतिक्षेनंतर जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. रेल्वेस्थानक परिसरात मंडप उभारण्याचे कामही सुरू आहे. महाप्रबंधक अरुणकुमार जैन यांनी बुधवारीच रेल्वेस्थानकाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर गुरुवारी सकाळीच मनमाड ते जालन्यापर्यंत वंदे भारत रेल्वेची चाचणी झाली.
सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही वंदे भारत रेल्वे जालना स्थानकात आली होती. त्यानंतर पुन्हा मनमाडकडे गेल्याचे सांगण्यात आले आहे. चाचणीसाठी वंदे भारत रेल्वेला आठ कोच लावण्यात आले होते. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबर रोजी वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे.