लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असली तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम अजूनही भाजीपाल्यावर फारसा दिसून येत नाही. सध्या बाजारात भाजीपाल्याची प्रचंड आवक असून सोमवारी टेंभुर्णीच्या साप्ताहिक बाजारात पुन्हा एकदा भाजीपाल्याचे दर घसरलेले दिसले.टेंभुर्णीच्या साप्ताहिक बाजारात बाजारापूर्वीच सकाळी होत असलेल्या भाजीपाला हर्राशीत सध्या भाजीपाला उत्पादक मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्रीसाठी आणत आहेत. यामुळे बाजारातील भाजीपाल्याच्या किरकोळ विक्रेत्यांना जागेवरच मुबलक प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत आहे. सोमवारच्या हर्राशीत कोबी व टोमॅटो यांची विक्रमी आवक दिसली.यामुळे बाजारात भाजीपाल्याच्या दरात घसरण आली असून दुष्काळी परिस्थितीतही जनतेला भाजीपाल्यावर यथेच्छ ताव मारायला मिळत आहे. सोमवारी बाजारात भाजीपाल्याचे दर असे होते.गोबी- २० रुपये किलो, टोमॅटो- १० रुपये किलो, वांगी- ३० रुपये किलो, हिरवी मिरची- ३० रुपये किलो, मेथी- ३ रुपये जुडी, कोथिंबीर- ५ रुपये जुडी, गाजर- २० रुपये किलो, मुळे- २० रुपये किलो, भेंडी- ३० रुपये किलो, बटाटे- २० रुपये किलो, कांदे- १० रुपये किलो असल्याचे दिसून आले.
आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर पुन्हा घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:09 AM