जालना/औरंगाबाद : जालना शहरासह जिल्ह्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, अजिंठा,सोयगाव, सिल्लोडमध्ये शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आकाशातून आग लागलेली वस्तू जमिनीवर कोसळत असल्याचे नागरिकांना दिसले. याचा व्हिडिओ व्हायरला झाला असून, या उल्का असल्याचे बोलले जात आहे. असेच दृश्य परभणी जिल्ह्यातील येलदरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथेही दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
शनिवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असावा. जालना शहरासह जिल्ह्यातील भोकरदन, मंठा, टेंभुर्णी, गोंदी, घनसावंगी, आदी ठिकाणी हा प्रकार दिसून आला. अनेकांनी हे दृश्य आपआपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. अवघ्या काही मिनिटांत ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याबाबत जालना अपर जिल्हाधिकारी केशव नेटके यांना विचारले असता, ते म्हणाले की, या प्रकरणाची माहिती प्रशासन घेत असून, तो उल्का असेल तर त्याची माहिती तज्ज्ञच देऊ शकतात. एखाद्या शेतात पडल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रात्री 8 ते 8. 30 वाजेच्या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा, सोयगाव, सिल्लोड येथून जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा, कोदा, जळगाव सपकाळ, हिसोडा, पिंपळगाव रेणुकाई या गावातील नागरिकांना उल्कापात सदृश्य दृश्य दिसले.
दुर्मिळ घटना, अनोळखी वस्तू आढळल्यास जमा कराआकाशातून नेहमीच कधी-तरी लहान-मोठ्या प्रमाणात उल्कापात होतच असतो; परंतु, पाहिलेल्या व्हिडिओनुसार अचानकपणे एकाच वेळी चार ते पाच उल्का पृथ्वीवर पडताना दिसतात. ही दुर्मीळ घटना म्हणता येईल. ज्या कोणाच्या शेतात या उल्कांचा दगड आढळून आल्यास तो त्यांनी आवकाश संशोधन केंद्राकडे सुपुर्द करावा; जेणेकरून शास्त्रज्ञांना त्याचा अधिक अभ्यास करता येईल.- सुरेश केसापूरकर, खगोल अभ्यासक