जालना : गावात दरोडा टाकून निघालेल्या टोळीचा पाठलाग करून सहापैकी एका दरोडेखोरास ग्रामस्थांनी पकडले आहे. ही घटना अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे बुधवारी तीनच्या सुमारास घडली. किसन ऊर्फ राजेंद्र दस्तगीर (२०, रा. हिरपुडी, ता. पैठण, जि. औरंगाबाद) असे ताब्यात घेतलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. त्याचे इतर पाच साथीदार फरार झाले आहेत.
धाकलगाव येथील मोल चुन्नूखॉं पठाण (३२) यांच्या घरी बुधवारी रात्री तीनच्या सुमारास संशयित आरोपी किसन ऊर्फ राजेंद्र दस्तगीर पवार हा त्याच्या पाच साथीदारांसह आला होता. फिर्यादीच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले. नंतर विठोबा खांडेभराड व मथुराबाई खांडेभराड यांना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल हिसकावून घेतला. शिवाय, साक्षीदार सखाराम लक्ष्मण लगड यांच्या घरासमोरून चार कोंबड्या असा एकूण ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्याच वेळी ग्रामस्थांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला.
ग्रामस्थांना किसन ऊर्फ राजेंद्र दस्तगीर हा जखमी अवस्थेत सापडला. पाच आरोपी फरार झाले आहेत. याची माहिती गोंदी पोलिसांना देण्यात आली. गोंदी पोलीस ठाण्यात स.पो.नि. सुभाष सानप, पो.उपनि. गजानन कौळासे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी मोल चुन्नुखॉं पठाण यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. उपनि. कौळासे हे करीत आहेत.