जालना : गेल्या पाच महिन्यांत जालना शहर वाहतूक शाखेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल २० हजार १७० नागरिकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ५५ लाख ७३ हजार ८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये ट्रिपल सीट जाणारे वाहनधारक तसेच कागदपत्रे नसणारी वाहने, परवाना नसणारे चालक आणि तोंडाला मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.
जालना शहरात बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम नेहमीच राबवली जाते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध जोरदार मोहीम राबविली. यामध्ये ट्रीपलसीट गाडी चालविणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे, फाळकी ओपन ठेवणे, नियमबाह्य नंबर प्लेट, गडद काचेचा वापर करणे, पोलिसांचा इशारा न पाळणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, बेदरकारपणे वाहन चालविणे तसेच अवैध प्रवासी वाहतूक, विना इन्शुरन्स, मराठी नंबर प्लेट, माल वाहनातून जनावरे नेणे, नो पार्किंग आदी २० हजार १७० केसेस करण्यात आल्या. त्यांच्याकडून ५५ लाख ७३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.
विना लायसन्स १११९ जणांना दंड
शहर वाहतूक शाखेने विना लायसन्स वाहन चालविणाऱ्या तब्बल १११९ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ५९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.
वेग मर्यादेचे उल्लंघन : ८१२ जणांवर कारवाई
रस्त्यावर कार चालविताना वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ८१२ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून ८ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गेल्या पाच महिन्यांत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० हजार १७० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात मास्क न घालणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, लायसन्स नसणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करूनच वाहने चालवावी. विनाकारण घराबाहेर फिरू नये.
-कैलास नाडे, सपोनि, शहर वाहतूक शाखा, जालना