जयंतीनिमित्त अभिवादन
जालना : तालुक्यातील विरेगाव येथे गुरू रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच अमोल जाधव, गणेश शिंदे, सुरेश जाधव, सुखदेव जाधव, रामदास म्हस्के, श्रीकांत बागल, सचिन पटेकर, प्रकाश पाडमुख, नामदेव गुंजाळ हे उपस्थित होते.
घाणीचे साम्राज्य ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जालना : जालना शहरातील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल समोरील नाली तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला देखील घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे नगरपालिकेने लक्ष देऊन नाली साफ करून रस्त्यावरील घाण व कचरा उचलावा, अशी मागणी होत आहे.
जालना येथे मनसेकडून नागरिकांचा सत्कार
जालना : जालना, बदनापूर येथे मनसेच्या वतीने मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा सर्वात जास्त प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दीपक महाराज जोशी व शेतकरी दामोधर जर्हाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गजानन गिते, कैलास नरोडे, सचिन आगळे, शेख मस्तान आदी उपस्थित होते.
वानडगाव येथे पौर्णिमा साजरी
जालना : तालुक्यातील वानडगाव येथे माघ पौर्णिमा निमित्ताने वानडगाव येथे कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी पूज्य भिक्खू रेवत व यशोदीप भिक्खू यांनी धम्मदेसना दिली. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोनाजी हिवाळे व संतोष आढाव हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय जंतनाशक मोहीम कार्यशाळा
मंठा : दरवर्षी आरोग्य विभागाच्या वतीने १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने १ मार्च रोजी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी स्वयंसेविकांची ढोकसाळ येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी दीपक लोणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी बचाटे, आरोग्य सहाय्यक सतीश निकम, सुजित वाघमारे आदी उपस्थित होते.
रामनगर परिसरात वृक्षांची कत्तल
जालना : जालना तालुक्यातील रामनगरसह परिसरात लागवड केलेल्या वृक्षांचे पाण्याअभावी हाल होत असून, एकही वृक्ष सुस्थितीत नाही. एकीकडे वृक्ष लागवडीचे तीन-तेरा वाजले असतानाच परिसरात वृक्षतोड मात्र जोमाने सुरू आहे. शेकडो वृक्षांची दररोज परिसरात कत्तल केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्यापाऱ्यांकडून शेत बांधावरील विविध जातीचे वृक्ष सर्रास तोडले जात आहेत.
त्या कामाची चौकशी करण्याची मागणी
भोकरदन : शहरातील प्रभाग क्रमांक २ पेशवेनगरात भूमिगत नालीचे काम चालू असून, हे काम बोगस होत आहे. हे काम तातडीने थांबवून चौकशी करण्याची मागणी प्रशांत मुळे यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या कामामुळे नळ कनेक्शन तुटले असून, त्यामुळे नळाला पाणी देखील येत नाही. याकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.