केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा ते गव्हाण संगमेश्वर या ५ किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मागील २० वर्षांपासून गव्हाण संगमेश्वरकरांना या खडतर वाटेने प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांना १० किमीचे अंतर कापून गावात जावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गव्हाण संगमेश्वर हे गाव १३ वर्षांपूर्वी जाफराबाद तालुक्यात होते. परंतु, त्यानंतर हे गाव भोकरदन तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. यामुळे गावाचा कायापालट होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. गावाचा कायापालट झाला. मात्र, गावाला येणारा रस्ताच झालेला नाही. या गावाची भोकरदन तालुक्यात आदर्श गाव म्हणून ओळख आहे. गावात ग्रामस्थांच्या पुढाकाराने जनहितार्थ योजना यशस्वी सुरु आहे. त्यात सुसज्ज शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, गावअंतर्गत सांडपाणी व्यवस्था, गल्लोगल्ली रस्ते, वृक्षारोपण, शौचालय, पिण्याच्या पाण्यासाठी जलशुध्दीकरण आदी कामे झालेली आहेत. या गावाला तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीचा मार्ग केदारखेडा आहे. मात्र, गव्हाण ते केदारखेडा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. वास्ताविक पाहता, हा रस्ता जालना- जळगाव मुख्य मार्गाला जोडून आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. या ५ किमी रस्त्याचे २० वर्षांपूर्वीच खडीकरण झालेले आहे. त्यानंतर साधी दुरुस्तीदेखील झालेली नाही. हा रस्ता पक्का व्हावा, यासाठी गव्हाण संगमेश्वर येथील माजी सरपंच रमेश पवार यांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले होते. परंतु केवळ आश्वासने मिळाली आहे.
भाजपचे वर्चस्व असून, रस्त्याची दुरवस्था
केदारखेडा ते गव्हाण संगमेश्वर हा रस्ता बदनापूर व भोकरदन या दोन विधानसभा मतदार संघाच्या कचाट्यात सापडलेला आहे. याच रस्त्यावर केदारखेडा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या बामखेडा गावाचा दोन किमीचा रस्ता बदनापूर मतदार संघात, तर पुढे गव्हाणला जाणारा तीन किमीचा रस्ता भोकरदन मतदार संघात येतो. त्यामुळे या रस्त्याकडे आमदार संतोष दानवे व आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची गरज आहे. या दोन्ही गावांवर भाजपचे वर्चस्व असून रस्त्याची दुरस्था कशामुळे? असा प्रश्न सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे.
===Photopath===
050321\05jan_5_05032021_15.jpg
===Caption===
रस्त्याची झालेली दुरवस्था