लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी एकरी सरसकट ५० हजार रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तासभर झालेल्या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित अखिल भारतीय किसान सभेच्या (लाल बावटा) वतीने सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. परतीच्या पावसाने घनसावंगी तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी किमान एकरी शेतकऱ्यांचे ५० हजार रुपये नुकसान झाले आहे. शासनाकडून त्यांना तातडीने मदत पोहचणे गरजेचे आहे. परंतु, सरकारी यंत्रणा उदासीन दिसत आहेत. पंचनाम्यात वेळ न घालता सरसकट एकरी ५० हजार रुपये अनुदान शासनाने जाहीर करावे, विमा कंपनीने लादलेल्या जाचक अटी शर्ती रद्द कराव्यात, पीक विमा क्लेमचे अर्ज भरून घेण्यासाठी कृषी विभागाने अधिकचे मनुष्यबळ वापरून गावनिहाय शेतकऱ्यांचे अर्ज जमा करून घ्यावेत. पीक कापणी प्रयोग वास्तुनिष्ट आणि पारदर्शक करावेत, जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी गोविंद आर्दड, आसाराम आर्दड, संतोष राठोड, बाळराजे आर्दड, जनार्धन भोरे, कुलदीप आर्दड, परमेश्वर मोरे, दगडू आर्दड, संभाजी तौर, दत्ताभाऊ राऊत, शामसुंदर डोंगरे, किशोर आर्दड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
नुकसानभरपाईसाठी तासभर रास्ता रोको...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:27 AM