यामुळे जालन्यात तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे हे असताना जालन्यात आणखी एक शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथे मंजूर होऊन ते सुरू देखील झाले आहे. तेथेच स्कील डेव्हलमेंट सेंटर सुरू केले होते; परंतु तेदेखील पाहिजे त्या क्षमतेने चालत नसल्याचे दिसून येत आहे. जालन्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधून जालन्यासह अन्य मोठ्या शहरांमध्ये चांगले अभियंते निर्माण झाले आहेत. त्यामुळे जालन्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय कायम ठेवून जर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मिळाल्यास जालन्यासाठी तो एक मैलाचा दगड ठरेल. त्यामुळे हा विचार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केल्यास दुग्धशर्करायोग ठरेल.
आयसीटीचा कॅम्पस विकास कागदावरच
देशातील आघाडीची तंत्रज्ञान शिक्षण संस्था म्हणून मुंबईतील आयसीटी अर्थात केमिकल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची जालन्यात स्वतंत्र शाखा सुरू होऊन तीन वर्ष झाली आहेत. असे असताना आजही ही संस्था भाडे तत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. या संस्थेसाठी जालन्याजवळील सिसरवाडी येथे जवळपास शंभर एकर जमीन मंजूर झाली असून, हा परिसर विकासासाठी निधीही मंजूर झालेला आहे. असे असताना आयसीटीच्या व्यवस्थापनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने सिरसवाडी परिसरात संपादित जागेवर एकही वीट लावलेली नाही.