जालना : कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला. परिणामी दिवाळी सण असला तरी पालिका कर्मचाऱ्यांचे पगार निर्धारित वेळेत झाले नाहीत. मात्र, फेस्टिव्हल ॲडव्हान्स आणि कोरोना मानधनामुळे कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
नगर पालिकेतील विविध विभागांत जवळपास साडेसातशे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. साधारणत: आठ ते बारा तारखेच्या दरम्यान या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार होतात. मात्र, कोरोनामुळे पगार वेळेवर होण्यास काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाकडूनच निधी उपलब्ध होत नसल्याने अडचण अधिक वाढली आहे. यंदा नगर पालिकेने दिवाळीनिमित्त फेस्टिव्हल ॲडव्हान्स दिला असून, कोरोनाचे मानधनही वाटप करण्यात आले आहे.
कोरोनानंतर उत्पन्नावर काय फरक पडला?कोरोनामुळे नगर पालिकेच्या कर वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके कराची वसुली व्हावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोरोनाचे कारण पुढे करीत अनेकजण कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याचा परिणाम पालिकेतील विविध कामकाजावर झाल्याचे दिसून येत आहे.
ॲडव्हान्समुळे दिलासादिवाळीनिमित्त बोनस मिळत नाही. मात्र, फेस्टिव्हल ॲडव्हान्स म्हणून १२ हजार ५०० रूपये देण्यात आला आहे. तर कोरोनाचे प्रत्येकी तीन हजार रूपये मानधन देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पगार कसा होणार?दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगर पालिका कर्मचाऱ्यांचे पगार लवकर करण्यासाठी सर्व कागदोपत्री तयारी करण्यात आली आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच पगाराची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल.
नियोजन करण्यात आले आहेपालिकेकडून कराची वसुली व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नगर पालिका कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत व्हावेत, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच पगारी केल्या जातील.- नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी