हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथून सिरसगाव, वाघ्रळ, खडकी, वज्रखेडा, गोषेगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने वाहने चालविणे अवघड झाले असून, पावसाळ्यात प्रचंड हाल होत आहे.
सिरसगाव येथून हसनाबाद, खडकी, वज्रखेडा, गोषेगाव व राजूरकडे जाता येते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनधारकांची वर्दळ असते. १९७२ साली या रस्त्याचे काम करण्यात आले होते. हसनाबाद ते सिरसगाव मार्गावर काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. प्रधामंत्री ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु, त्यानंतर जि.प.च्या बांधकाम विभागाकडे सदरील काम देण्यात आले. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यावर मुरूम टाकण्यात येतो. परंतु, त्याचा काहीच फायदा होत नाही.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहे. या रस्त्यावरून हसनाबाद, सिल्लोड, औरंगाबादकडे जात येते. परंतु, रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याचे काम मंजूर
या रस्त्याची दुरवस्था पाहता, वर्षभरापूर्वी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती. परंतु, अद्यापही काम सुरू झाले नाही. त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवाय, वज्रखेडा रस्त्यावरील हत्ती नाला येथे पूल नाही. त्यामुळे हा रस्ता बंद आहे. खडकीकडे जाणारा रस्तासुद्धा चिखलमय झाला आहे. गोपेगाव या सात किमी रस्त्याचेसुद्धा तीन तेरा वाजले आहे. या रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.