लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कडून जिल्ह्यात शौचालय उभारण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा पाणंदमुक्त झाल्याचा प्रशासनाकडून डांगोरा पिटला जात आहे, असे असताना बेसलाईन मधून सुटलेल्या ३५ हजार कुटुंबियांकडे अद्यापही शौचालय नसल्याचे समोर आले आहे.मागील काही वर्षापासून जिल्हा पाणंदमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यामातून प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हाभरातील सुमारे २ लाख ६२ हजार ५४७ कुटुंबांकडे शौचालय आहे. बेसलाईन सर्व्हेनंतर तब्बल १ लाख ७४ हजार ८१५ कुटुंबांनी शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. परंतु, पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या ३७ हजार ३३७ कुटुंबांना यावर्षी ३१ मार्च अखेरपर्यंत शौचालय देण्याचे उद्दिष्टे स्वच्छ भारत मिशन विभागाला होते. परंतु, आतापर्यंत केवळ २ हजार २२९ शौचालयाची कामे पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ३५ हजार १०८ कुटुंब अद्यापही शौचालयाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबनिहाय शौचालयाचा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार सुमारे १ लाख ७४ हजार ८१५ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे समोर आले होते. हेच उद्दिष्ट डोळ््यासमोर ठेवून स्वच्छ भारत मिशन काम सुरु केले. मात्र सुरुवातीच्या काही दिवस या कामाला मरगळ आली होती. परंतु, लाभार्थ्यांची निवड होऊनही अनेकांना वेळेवर अनुदान आदी अडचणीमुळे अनेकांना शौचालयापासून वंचित राहावे लागले. अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी गावोगावी जाऊन जनजागृती करुन शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांना प्रवृत्त करीत असत. एवढे करुनही ग्रामस्थांनी शौचालय बांधकामाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्याविरुध्द गुडमॉर्निग पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. त्यामुळे शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. बेसलाईन सर्व्हेनुसार शौचालय नसणाऱ्या १ लाख ७४ हजार ८१५ कुटुंबांनी शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. परंतु, पायाभूत सर्वेक्षणातूनही जिल्ह्यातील ३७ हजार ३७७ कुटुंबे सुटली होती. सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन विभागाला देण्यात आले होते. यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे.बेसलाईन सर्व्हेनुसार उभारली शौचालयेस्वच्छ भारत मिशनच्या माध्यामातून करण्यात आलेल्या बेसलाईन सर्व्हेनुसार स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. २०१४ पासून जिल्हा परिषदेच्यावतीने अंबड तालुक्यातील २६५०६, भोकरदन ३०७०२, घनसावंगी २९२२०, बदनापूर १३५५९, परतूर १५८५४, जालना २६८२९, मंठा १७५३७, जाफराबाद तालुक्यात १४६०८ शौचालये बांधण्यात आली आहेत.
३५ हजार कुटुंबांना शौचालयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:12 AM