प्रकाश मिरगे ।लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : स्वच्छ भारत अभियान आणि शासनाच्या आदर्श ग्राम संसद योजनेत जाफराबाद तालुक्यातील खासगाव जालना जिल्ह्यात मॉडेल ठरले आहे. खासगाव ग्रामस्थांनी लोकसहभागातून जलयुक्त शिवार, स्वच्छता अभियान, सांडपाणी व्यवस्थापन, नाना नानी पार्क, पाच रुपयांत शुद्ध पाणी, धोबी घाट यासारख्या योजना राबवून आदर्श निर्माण केला आहे.सरपंच संतोष लोखंडे यांनी सर्व सदस्यांना सोबत घेऊन शासनाच्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या संकल्पनेच्या पुढे जाऊन काम केले आहे. खासगाव हे तालुक्यातील बाजारपेठेचे गाव आहे. या गावास आ. संतोष दानवे यांनी दत्तक घेतले आहे. त्यांनी गावातील विकास कामांना चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. लोकसहभागातून पुढाकार घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.१ हजार ९६० कुटुंबे असून एकूण लोकसंख्या पाच हजार आहे. गावात घरोघरी शौचालये बांधण्यात आली आहेत. ज्या कुटुंबाकडे स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यासाठी जागा नाही, अशा कुटुंबांना ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली. त्यातून एकाच ठिकाणी १३० स्वच्छतागृहे बांधण्यात आली. गाव स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून गावाच्या चोहोबाजूंनी तसेच दर्शनी भागात विविध फुलझाडे व वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी वॉटर फिल्टरच्या माध्यमातून पाच रुपयांत पंधरा लिटर शुध्द पाण्याचे वाटप केले जाते. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत नाल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. गांडूळखत निर्मिती प्रकल्प, परसातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या सोयी उपलब्ध करून येथील आरोग्य केंद्राला आरोग्य विभागाच्या कायाकल्पअंतर्गत जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्मार्टग्राम योजनेसाठी आवश्यक त्या निकषांची पूर्तता करण्यात आल्याने खासगावची तालुक्यातून प्रथम क्रमांकाने निवड झालीे.येथील विकास कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे, तत्कालीन जिल्हाधिकारी एस.आर. रंगानायक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोपटराव पवार आदी मान्यवरांनी भेटी देऊन येथील उपक्रमांचे कौतुक केले आहे.
स्मार्ट ग्राम पाहायचंय? मग खासगावला या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:39 AM