लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समाजातील अंधश्रद्धा, व अनिष्ट रुढी परंपरांवर प्रबोधन करुन आदर्श समाज निर्मितीसाठी महत्वपूर्ण योगदान देणारा वारकरी संप्रदाय आता जिल्ह्यातील हागणदारीवर प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन करणार आहे.शासनाने राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी वारकरी सांप्रदायाचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायाचे प्रवचनकार, कीर्तनकार आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी सांप्रदाय मंडळींनी आपल्या प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेचा जागर करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, ह.भ.प. नरहरी बुवा चौधरी महाराज, जिल्हा वारकरी सांप्रदाय अध्यक्ष ह.भ.प. विलास महाराज देशमुख , ह.भ.प. श्रीराम सोरमारे महाराज, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांची उपस्थिती होती. २६ जानेवारीपासून ते १० फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील निवडक २० ते ३० वारकरी प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेबाबत प्रबोधन करणार आहेत. वारकरी साहित्य परिषदे मार्फतच सदर वारक-यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीला संबोधित करताना ह.भ.प. चौधरी महाराज म्हणाले की, समाजात बदल कायद्याने होत नाहीत, त्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. गावातील स्वच्छतेबरोबरच वारकरी हे लोकांच्या अंतकरणाची स्वच्छता करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भगवान तायड यांनी केले.यावर होणार प्रबोधनया माध्यमातून शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, गावातील स्वच्छता सुविधांची देखभाल व दुरुस्ती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ओला व सुका कचरा व्यवस्थापन, शौचालय वापराची सवय व प्लास्टिक वापर बंदी या प्रमुख बाबींवर वारकरी गावात प्रबोधन करणार आहेत.
स्वच्छता अभियानात वारकऱ्यांचा राहणार सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 1:01 AM