लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील जवळपास दीड हजारपेक्षा अधिक लहानमोठ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तंबी दिली असून, त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्यात लहानमोठ्या ९०० पेक्षा अधिक गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. उत्सव सुरू होऊन आता आठ दिवसांचा कालावधी लोटला असून, पुढील दोन दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. मिरवणूक वेळेत सुरू करून ती वेळेत संपवावी म्हणून पोलिसांनी यापूर्वीच शांतता समितीची बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्वांनी यासाठी पुढकार घेण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे मानाचा गणपती हा सर्वात पुढे राहण्याची परंपरा आहे. त्यानुसार तो सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान मिरवणुकीसाठी सज्ज करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.एकूणच जिल्ह्यात शांततेची परंपरा आहे. ती यंदाही कायम राहावी म्हणून पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. तत्पूर्वी जे कोम्बिंग आॅपरेशन केले गेले, त्याचा मोठा सकारात्मक परिणाम समाजात उमटल्याचे दिसून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि जालना शहरातील तीनही पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीतील असे एकूण दीड हजारपेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. जालना शहरात दोन विभागातून मिरवणुका निघतात त्यात नवीन आणि जुना जालन्याचा समावेश आहे. मुख्य मिरवणूक ही नवीन जालना भागातून निघते. तर जुना जालना भागातही अनेक लहान मोठ्या मिरवणुका सकाळपासूनच सुरू होतात.यंदा डीजे लावण्यावरून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे ऐन वेळेवर न्यायालयाकडून काय निर्णय होतो, हे अद्याप ठरले नसल्याने अनेक लहान-मोठ्या गणेश मंडळांनी बँड पथक तसेच ढोल पथकांची बुकींग केली आहे. यंदा या ढोल पथकात महिला व युवतींचा मोठ्या प्रमाणार समावेश असल्याचे सांगण्यात आले. जालना शहरात किमान १८ ढोल पथक असल्याचे गणेश महासंघाकडून सांगण्यात आले.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांची तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:03 AM