लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकीकडे पाणी टंचाईने यंदा जालन्यातील जवळपास सर्वच उद्योगांना टँकरचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे टँकरवर लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यातच दोन वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक महानगर पालिका आणि अ वर्ग दर्जाच्या पालिकेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प उभारणे बंधनकारक केले होते. त्या दृष्टीने जालना पालिकेने सर्वेक्षणही केले होते. परंतु, अद्यापही हा प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही.दिवसेंदिवस कमी होणारा पाऊस तसेच त्यातून मिळणारे पाणी हे अल्पकाळ टिकते. पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम आता जोर धरत असून, त्यांचे महत्त्व आता सर्वसामान्यांना पटले आहे. असे असले तरी शुध्द पाण्यावर उद्योग, व्यवसायाचे उत्पादन करण्या ऐवजी जे शहरातून लाखो लिटर सांडपाणी वाया जाते, त्यासाठी जर जालना पालिका तसेच जिल्हा प्रशासाने उद्योजकांना सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प उभा करून त्या पाण्यावर शास्त्रीयदृष्ट्या प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयोग करता येणे शक्य आहे. तसेच निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच जारी केले आहेत. त्यानुसार जालना पालिका आणि जीवन प्राधिकरण यांनी कुंडलिका नदीचे सर्वेक्षण करून काही जागांची पाहणी केली होती.परंतु नंतर हा प्रकल्प रखडला आहे. त्यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेऊन सांडपाण्याचा पुनर्वापर करणारा प्रकल्प जालन्यात कार्यान्वित केल्यास, त्यातून त्यांना भक्कम महसूलही मिळू शकेल. या संदर्भात जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सिंग यांच्याशी संपर्क केला असता, या प्रकल्पा बाबत प्राथमिक पातळीवर जालना पालिके सोबत चर्चा झाली आहे. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल तसेच मुख्याधिकारी संतोष खांडेकर हे देखील या बाबत सकारात्मक आहेत. आपण आज मुंबईला असून, आल्यानंतर या प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे, या बद्दल माहिती देऊ असे सिंग म्हणाले. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जालन्यातील उद्योजकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.स्टील उद्योगासाठी ठरू शकतो वरदानजालन्यातील उद्योजकांना यावेळी एमआयडीसीकडून पिण्यापुरतेही पाणी मिळालेले नाही. त्यामुळे उद्योग चालविण्यास पाणी मिळणे दूरची बाब होती. विशेष करून जालन्यात मोठ्या प्रमाणावर स्टील उद्योग स्थिरावला आहे. त्या उद्योगाला भरमसाठ पाणी दररोज लागते. पाण्या शिवाय स्टीलचे दर्जेदार उत्पादन होऊच शकत नाही. त्यामुळे जर जालन्यात सांडपाण्यावर आधारित प्रकल्प कार्यान्वित झाल्यास त्याचा सर्वात मोठा लाभ हा स्टील उद्योगांना होणार आहे. त्या बदल्यात स्टील उद्योगाकंडून स्वतंत्र पाणीपट्टी वसूल करता येणे शक्य आहे.
उद्योगांसाठी सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची गरज...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:46 AM