लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जायकवाडी-जालना योजनेचा पाणीपुरवठा थकित बिलापोटी थांबविण्यात आला आहे. तशा आशयाची नोटीस पालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत झाला असून, अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. ऐन उन्हाळ्यात जालनेकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे .जायकवाडी-जालना योजनेसाठी पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी घेतले जाते. यासाठी नगरपालिकेला पैठण पाटबंधारे विभागाला नियमित पाणीपट्टी भरावी लागते. मात्र, पाणीपट्टीचा नियमित भरणा न केल्यामुळे पाटबंधारे विभागाचे नगरपालिकेकडे एक कोटी रुपये थकले आहेत. या थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाने पालिकेला नोटीस बजावली आहे. मार्चअखेर सुरू असल्यामुळे चालू व मागील थकबाकीचा तात्काळ भरणा करावा, अन्यथा पाणीपुरवठा कायमचा खंडित केला जाईल, असे नोटिसीत नमूद आहे. पाटबंधारे विभागाच्या नियमित थकबाकीचा भरणा करताना पालिका प्रशासनाची दमछाक होत असताना, एकाच वेळी एक कोटी रुपयांची थकबाकी भरणार कशी, हा प्रश्न पालिका प्रशासनासमोर आहे. पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपासून पाणीउपसा थांबविल्याने जुना जालन्यातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा लांबणीकर पडला आहे. शनिवारी व रविवारी कसबा, माळीपुरा, गांधीचमन, देहेडकरवाडी या भागांत काही मिनिटेच पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांना आवठड्यातून एकदा येणारे पाणीही पुरेसे साठवता आले नाही. नूतन वसाहत भागात शुक्र्रवारपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाची चालू व एकूण थकबाकी भरण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन सुरू असल्याचे पालिकेचे अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी सांगितले.थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाला दहा लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी तडजोड सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मार्चअखेर संपूर्ण थकबाकी भरली तरच पाणीपुरवठा सुरळीत राहिली, अन्यथा जायकवाडी धरणातून जालन्यासाठी घेतले जाणारे पाणी कायमचे थांबविण्यात येईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने नोटिसीद्वारे दिला आहे.