जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड गावातील वॉर्ड क्रमांक एक, दोन, पाच व सहामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने उभ्या केलेल्या जलकुंभाची क्षमता गरजेपेक्षा कमी आहे. परिणामी या भागात पाणी टंचाई सतत निर्माण होत असून, नवीन जलकुंभ उभा करण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतीने विजेचा प्रश्न पाहता चौदाव्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा करणाऱ्या तीन विहिरीवर तब्बल २४ लक्ष रूपये खर्च करून सौर ऊर्जा पंप बसविले आहेत. परंतु, इतका खर्च करूनही गावातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. गावामधील ज्या वार्डामध्ये सार्वजनिक पाईपलाईन नव्हती तेथे पाणी पोहचावे म्हणून कार्यालयाने पुन्हा चौदा वित्तच्या माध्यमातून दहा लक्ष खर्च करून अंतर्गत पाईपलाईन केली. ही कामे करूनही पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे सौर ऊर्जा पंप बसवून सहा महिनेच झाले. परंतु, सदरील पंपाद्वारे अजूनही विहिरीतील पाणी जलकुंभामध्ये पडले नाही. परिणामी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
कोट
पाणी पुरवठ्याबाबत मासिक बैठकीत सौर ऊर्जा पंपाबाबत सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. झालेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. ग्रामपंचायतीने पाणी प्रश्न तातडीने सोडवावा.
सौमित्रा नारायण म्हस्के
ग्रामपंचायत सदस्य, जामखेड
गावातील वार्ड क्रमांक एक, दोन, पाच व सहा मधील नागरिकांना गत वीस दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. निर्माण झालेल्या पाणी प्रश्नामुळे ग्रामपंचायतीने केलेला लाखो रूपयांचा खर्च करून उपयोग काय ? असा प्रश्न आहे. या कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी.
नवनाथ मुळे
ग्रामपंचायत सदस्य, जामखेड
जलकुंभाचा आराखडा पाठविला
गावाची लोकसंख्या पाहता साडेसहा लक्ष साठवण क्षमता असलेल्या जलकुंभाची गरज आहे. परंतु सध्या अडीच लक्ष क्षमता असलेला जलकुंभ आहे. नवीन जलकुंभासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.
के. के. कल्याणकर
ग्रामविकास अधिकारी, जामखेड