लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील तुंबलेल्या नाल्या आणि पाणीटंचाईवरून संतप्त नगरसेवकांनी शनिवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसधारण सभेत स्वच्छता निरीक्षकांना रडारवर घेतले होते. स्वच्छता निरीक्षक कर्तव्यकसूर करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरण्यात आली. इतर विभागातील अधिकाऱ्यांनाही नगरसेवकांनी धारेवर धरले. शिवाय शहरांतर्गत पाईपलाईनसह इतर प्रश्नांवरूनही या सभेत गोंधळ उडाला होता.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शनिवारी सकाळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. ही सभा गाजली ती तुंबणा-या नाल्या, पाणीपुरवठा आणि अंतर्गत पाईपलाईनच्या कामावरून! यावेळी स्वच्छता निरीक्षकांना नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले होते. थोडाही पाऊस झाला की नाल्या तुंबत असून, अनेकांच्या घरात पाणी घुसत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी संपर्क केला असता स्वच्छता निरीक्षकांशी संपर्क होत नाही. तक्रारी करूनही स्वच्छता केली जात नाही, अचानक आपत्ती आली तर काय करणार? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून नगरसेवकांनी स्वच्छता निरीक्षकांना फैलावर घेतले होते. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी ज्या भागातील तक्रारी आहेत, त्या भागातील नाली सफाईसह स्वच्छतेची कामे तातडीने करण्याच्या सूचना स्वच्छता निरीक्षकांना दिल्या.शहरातील काही भागात पाईपलाईन टाकण्याचे काम केले जात आहे. मात्र, पाईपलाईनचे काम नियमबाह्य होत आहे. या कामाकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. केलेल्या कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी, चौकशी होईपर्यंत बील आदा करू नये, अशी मागणीही नगरसेवकांनी यावेळी लावून धरली. तसेच शहरात सुरळीत पाणीपुरवठा झाल्याशिवाय पाणीपट्टी वसूल करू नये, अशी मागणीही करण्यात आली. या ठरावाला उपस्थित नगरसेवकांनी मान्यता दिली. शहरांतर्गत जीओ कंपनीमार्फत करण्यात येणाºया कामामुळे रस्ते खराब झाले आहेत. शिवाय पाईपलाईन अंथरणाºया एजन्सीकडूनही रस्ते, नाल्या खराब होत आहेत. ती दुरूस्ती संबंधितांकडून करून घ्यावी, दुरूस्ती न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही करण्यात आली. शिवाय पालिकेतील इतर विभागातील अधिकारीही नगरसेवकांच्या निशाण्यावर आले होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.पाण्याच्या टाकीसाठी ठिय्यानगरसेविका रफियाबेगम वाजेद खान यांनी सूचित केलेल्या जागेपासून पाच किलोमीटर दूर पाण्याची टाकी उभी केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.टाकी दूर होत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होणार असून, सूचित केलेल्या जागीच नवीन पाण्याची टाकी बांधावी, या मागणीसाठी त्यांनी थेट सभागृहातच ठिय्या मांडला. नगराध्यक्षांनी स्थळ पाहणी करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.टाकी औरंगाबादला बांधा, पण पाणी द्यासूचित केलेल्या जागी पाण्याची टाकी बांधली जात नसल्याने इतरही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ‘टाकी औरंगाबादला बांधा पण पाणी द्या’, अशी मागणी त्यांनी केली.चमडा बाजार हटवाजालना शहरातील मंगळवार बाजार परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून चमडा बाजार भरतो. तो नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहराबाहेर स्वतंत्र जागा देऊन तो तेथे हलवावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी केली.पालखी मार्गाच्या दुरूस्तीची मागणीशहरातील जामा मशिद ते विठ्ठल मंदिर या मार्गावरून आनंदस्वामी पालखी मिरवणूक जाते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मागीलवर्षी शिवसेनेने आंदोलन केले होते. मात्र, अर्धवट काम करण्यात आले. या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक विजय पवार, निखिल पगारे, विष्णू पाचफुले, संदीप नाईकवाडे आदींनी सर्वसाधारण सभेत केली.मालमत्ता सर्वेक्षणावरही नाराजीशहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणाºया एजन्सीने चुकीचे सर्वेक्षण केल्याचा आरोप नगरसेविका संध्या देठे यांनी केला. ज्यांच्या नावे मालमत्ता नाही, त्यांनाही कर आकारण्यात आला आहे. त्यामुळे या एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी मुख्याधिकाºयांनी संबंधित एजन्सीच्या चुकांचे प्रमाण पाहून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
पाणीपुरवठा, स्वच्छतेवरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:30 AM