लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पथदर्शी प्रकल्प म्हणून परतूर, मंठा व जालना तालुक्यात १७६ गावांसाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटर ग्रीड योजनेची स्थापत्याची ५५ टक्के पूर्ण झाली आहेत. लवकरच यांत्रिकीसह विद्युत कामांना सुरुवात होणार असून १ वर्षात ही योजना कार्यान्वित होईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी रविवारी दिली. आतापर्यंत झालेल्या कामांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ठाणे येथील अधीक्षक अभियंत्यांच्या गुणवत्ता पथक सोमवारपासून तांत्रिक तपासणी करणार आहेत.तांत्रिक तपासणीपूर्वी पालकमंत्री लोणीकर यांनी रविवारी या पथका सोबत योजनेच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. पथकासोबत मापेगाव बु येथील निम्न दुधना धरणात सुरु असलेल्या जॅक वेल, जोडकालवा व जोडपूल, तसेच रोहिना बु. जवळील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. या वेळी मजीप्राचे मुख्य अभियंता लोलापोड, गुणवत्ता पथकातील अधीक्षक अभियंता पलांडे, शिंगरू, कार्यकारी अभियंता अजय सिंग , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे डी. एच. डाकोरे, उपअभियंता म्हात्रे, संबंधित कंत्राटदार आदींची उपस्थिती होती.या योजने अंतर्गत तांत्रिक दृष्ट्या १२ झोन प्रस्तावित असून एका झोनमध्ये १२ ते १८ गावांचा समावेश आहे. प्रत्येक झोनसाठी एक मुख्य संतुलन टाकी प्रस्तावित करण्यात आली १२ टाक्यांची ५५टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मुख्य संतुलन टाक्यांपासून गावातील पाण्याच्या उंचटाकीपर्यंत पाणी नेण्यासाठी ५०० ते १०० मि.मी व्यासाची पाईपलाईन ५७७ किलोमीटर पाईपलाईन अंथरण्यात येणार आहे. पैकी ४५२ किलोमीटरसाठी पाईप प्राप्त झाले असून २१७ किलोमीटर कामे झाले आहे. ६७ गावांमध्ये नवीन जलकुंभ प्रस्तावित केले असून ५८ जलकुंभाचे कामे प्रगतीपथावर आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्राजवळ कार्यालय इमारत, विश्रामगृह, गोडाऊनची कामे प्रगतीपथावर आहे. योजनेत ३७ गावांमध्ये ५७ किलोमीटर वितरण व्यवस्था टाकण्यात येणार असून , ९६ गावांमध्ये नवीन वितरण व्यवस्था टाकण्याचे कार्यादेश देण्यात आले आहे. आतापर्यंत स्थापत्याच्या कामांवर ९८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पालकमंत्री लोणीकर यांनी या कामांची प्रगती समाधानकारक असल्याचे सांगितले. यांत्रिकी कामांतर्गत शुद्ध पाण्याच्या पंपिंग मशिनरी , सर्ज व्हेसल्स, मुख्य टाकी, व आॅटोमेशन ,फ्लोमीटर व क्लोरिनेटर आदींसाठी साहित्याचा पुरवठा, उभारणीसाठी १८. ६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
वॉटरग्रीड योजनेची तांत्रिक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 12:42 AM