घनसावंगी (जि. जालना) : टायपिंगच्या परीक्षेला जाताना समोर आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार विद्युत खांबाला धडकल्याची घटना घनसावंगी येथील पेट्रोलपंपासमोर शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात तिघे जण ठार झाले ( Three killed in Accident while going Exam ) असून, अन्य एकजण गंभीर जखमी आहे. सुनिल मदन जाधव (रा. लालवाडी, ता. अंबड), आरती मिरकड (रा. अंबड), वंदना सुरेश राजगुरू (रा. राहेरा, ता. घनसावंगी) अशी मयतांची नावे आहेत. योगेश धोंडीराम राऊत (रा. लालवाडी, ता. अंबड) असे जखमीचे नाव आहे.
अंबड येथील देवगिरी टायपिंगचे संचालक योगेश राऊत व त्यांचे दाजी सुनील जाधव, आरती मिरकड, वंदना राजगुरू हे सर्व जण शुक्रवारी सकाळी घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयात टायपिंगच्या परीक्षेसाठी कारने (एमएच. २१. एक्स. ०८८९) जात होते. घनसावंगी शहराजवळील पेट्रोलपंपाजवळ आल्यावर पेट्रोल भरून आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून कार विद्युत खांबाला धडकली.
अपघात होताच योगेश राऊत याने गाडीतून बाहेर उडी मारली. यात वंदना राजगुरू ही जागीच ठार झाली. नागरिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून घनसावंगी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना सुुनील जाधव व आरती मिरकड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे घटनेमुळे जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.