पवन पवार, वडीगोद्री ( जालना): "आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य असून आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीमधील सर्व गुन्हे मागे घेतील," असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसंच राजकीय इच्छाशक्ती असेल तर ७ दिवस नाही, २ तासांत कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठवाडा दौऱ्यावर जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठवाडा दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून आज सकाळी ७:१५ वाजता रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हिंगोली दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत हिंगोलीत आज मराठा समाजाची महाएल्गार शांतता रॅली निघणार आहे. एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असेत, त्यामुळे मराठा समाजाने या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नसल्याचं जरांगे यांनी १३ तारखेनंतर पुढची दिशा काय या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे
"छगन भुजबळ त्यांच्या लोकांना सांगून, त्यांना पदांचे आमिष दाखवून आमच्या मराठा सामजाच्या शांतता रॅलीत काही करायला लावतील," असा संशय जरांगे यांनी व्यक्त केलाय. जर आमच्या शांतता रॅलीत काही झाले तर त्याला छगन भुजबळ आणि सरकार जबाबदार राहील असं जरांगे म्हणाले. मोठ्या वाहनांचा ताफा घेऊन जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मराठवाडा दौऱ्यावर रवाना झाले आहेत.