-विजय मुंडे
जालना : शासनाने मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरचे मराठा समाज स्वागत करीत आहे. परंतु, त्यातील वंशावळीचा शब्द वगळून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, असा बदल करा, अशी मागणी आंतरवाली सराटी (ता.अंबड) येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी केली. या बदलासाठी एक- दोन दिवसांचा वेळ घ्या, परंतु, जीआरमध्ये तेवढा बदल करा. तोपर्यंत आमचे उपोषण सुरू राहिल, असे मनोज जरांगे म्हणाले.
शासन निर्णयावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी गुरूवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेला निर्णय आणि काढलेल्या जीआरचे मराठा समाजाच्या वतीने स्वागत आहे. परंतु, या शासनाच्या निर्णयाचा ज्यांच्याकडे वंशावळी असतील त्यांनाच लाभ होईल. इतर समाज बांधवांना त्याचा काही लाभ होणार नाही. शासनाने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. ती समिती एका महिन्यात अहवाल देणार आहे. त्यानंतर जो निर्णय येईल तो. परंतु, आम्ही हट्टाला पेटलो नाहीत, सरकारनेही पेटू नये. आमची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, ही आहे. सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे मराठा समाज त्याचे स्वागत करतो. आपण जीआरमध्ये वंशावळीचा शब्द वगळून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी सुधारणा करावी, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली.
शांततेत आंदोलन करामराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रात समाज बांधव आंदोलने करीत आहेत. आमच्या येथील जखमी आई-बहीण, भाऊ आजही दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे आपल्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आणि शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्याशासनाने आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे आदी मागण्याही जरांगे यांनी यावेळी केल्या.