लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील खरपुडी गावात संशयित रूग्ण आढळल्याचा बनावट संदेश बुधवारी रात्रीपासून व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाला आणि खरपुडीतील प्रत्येकाचा फोन खणखणू लागला. आप्तेष्टांकडून येणारे फोन आणि बनावट संदेशामुळे खरपुडीवासियांची झोप उडाली असून, गावातील व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.महाराष्ट्रात कोरोनाचे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. सर्वत्र कोरोना आजाराचीच चर्चा आहे. याच धर्तीवर जालना तालुक्यातील खरपुडी गावात कोरोनाचा पहिला संशयित रूग्ण आढळल्याचा बनावट संदेश विविध व्हॉटस्अॅप ग्रुपवर बुधवारी रात्री व्हायरल झाला. पाहता पाहता हा संदेश जिल्हाभरातील व्हॉटस्अॅप ग्रुपवर फिरू लागला आणि खरपुडी येथील प्रत्येकाचे फोन खणखणू लागले. नातेवाईक फोन करीत असल्याने आणि बनावट संदेश फिरू लागल्याने भयभीत झालेल्या खरपुडी ग्रामस्थांनीही संदेशाची शहानिशा करण्यासाठी थेट जालना व औरंगाबाद रूग्णालयाशी संपर्क करू लागले. मात्र, खरपुडीतील कोणताही रूग्ण नसल्याचे समजल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, या बनावट संदेशामुळे गावातील व्यवहारावर परिणाम झाला. दूध घेऊन आलेल्या अनेकांकडील दूधही नागरिकांनी घेतले नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. एकूणच एका बनावट संदेशामुळे पाच हजार लोकसंख्या असलेल्या खरपुडी ग्रामस्थांची मात्र चांगलीच धांदल उडाली होती.औरंगाबाद घाटीत ‘त्या’ नावाचे डॉक्टर नाहीतव्हॉटस्अॅपवर फिरणाऱ्या बनावट संदेशात औरंगाबाद घाटी रूग्णालयातील डॉ. शिवहरी घोरपडे, असे नाव टाकून प्रतिबंधक उपाययोजना सूचित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात वरील नावाचा एकही डॉक्टर औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात कार्यरत नसल्याची माहिती घाटी रूग्णालय प्रशासनाने दिली आहे...आणि पाहुणे आलेच नाहीतगावातील एका मुलीला पाहण्यासाठी गुरूवारी पाहुणे येणार होते. पाहुणे येणार म्हणून मुलीच्या घरच्यांनी स्वयंपाकाची तयारी केली. पाहुण्यांच्या स्वागताची तयारी केली. मात्र, खरपुडीतील कोरोना संशयिताचा संदेश व्हायरल झाला आणि मुलीला पाहण्यासाठी आलेले पाहुणे आलेच नाहीत, असे सरपंच देठे यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील बनावट संदेशामुळे खरपुडीकर भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:40 PM