वडीगोद्री (जि.जालना) : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे बुधवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. कामासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एकुलत्या एक युवकावर काळाने घाला घातल्याने वडीगोद्री गावावर शोककळा पसरली आहे.
अभिषेक ज्ञानेश्वर आटोळे (वय २५ रा. वडीगोद्री ता.अंबड) असे मयताचे नाव आहे. वडीगोद्री येथील अभिषेक आटोळे हा बुधवारी सकाळी दुचाकी घेवून वडीगोद्रीहुन छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. सोलापूर- धुळे महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर भरधाव आलेल्या कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातानंतर दुचाकी ५०० फूट घसरत गेली. यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेकचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यानंतर मयताच्या पार्थिवाचे पाचोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी वडीगाेद्री येथे मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात आजी-आजोबा, आई-वडील, बहीण असा मोठा परिवार आहे. अपघातात एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने आटोळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
थांबला असता तर बर झालं असतं...अभिषेक आटोळे हा छत्रपती संभाजीनगर येथील एका मॉलमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होता. वडीगोद्री येथे मंगळवारी रात्री मुक्काम करून तो बुधवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर गेला. घरापासून अवघ्या ६ किमी अंतरावर त्याचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या आजोबांनी थांबला असता तर बरं झालं असतं.. असे म्हणत हंबरडा फोडला होता.
मित्रांची भेटही ठरली शेवटचीघरातून निघाल्यानंतर अभिषेक धुळे सोलापूर महामार्गाच्या साफसफाईच्या कामाला असलेल्या मित्रांना भेटला. त्यांची चेष्टामस्करी करून तो पुढे गेला. परंतु, काही मिनिटातच अभिषेकच्या अपघाती मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्याच्या मित्रांनाही मोठा धक्का बसला. दहा मिनिटांपूर्वी भेटलेल्या अभिषेकची ती भेट शेवटची ठरल्याच्या भावना मित्रांनी व्यक्त केल्या.