- प्रकाश मिरगे
जाफराबाद (जि. जालना) : ज्या पावसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, त्या पावसाचा यंदा कहर झाला. अतिवृष्टीमुळे पूर्णा, धामणा, केळणा नद्यांचा रुद्रावतार प्रथमच पाहिला. नदीच्या पुरात पिकेच काय आमच्या जमिनीही वाहून गेल्या. शासन तुटपुंजी मदत करेल; पण अस्मानी संकटात आमचे झालेले नुकसान भरून निघेल का? असा प्रश्न जाफराबाद तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.
जाफराबाद तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे बाजरी, मका, कपाशी, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांची बैठक घेऊन दिले. तालुक्यातील १०१ गावांपैकी ४४ गावात पंचनामे झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित दोन दिवसात ५७ गावांचे पंचनामे पूर्ण करणार असल्याचा दावा प्रशासन करीत आहे.
नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जाफराबाद शिवारातील शेतीची पाहणी केली असता विदारक चित्र दिसून आले. अतिवृष्टीमुळे पूर्णा-धामना, केळणा नदीला पूर आला होता. या पुरात पिकासह जमीन वाहून गेली. या अस्मानी संकटाचा कहर बोरखेडी गायकी, सावंगी, टाकली, जाफराबाद, खामखेडा, नळविहरा, निमखेडा, पिंपळखुटा, देऊळझरी येथे पाहावयास मिळाला.
सर्जेराव वरगणे, सय्यद अब्बास, फकिरबा वरगणे, सय्यद युसूफ, उषा वरगणे, बोरखेडी गायके येथील पंढरीनाथ शामराव गायके आदी शेतकऱ्यांची पिकेच नव्हे तर जमीनही या पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करताना जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकची मदत करावी, अशी मागणी शामराव गायके यांनी केली आहे.
४४ गावांतील पंचनामेतालुक्यातील १०१ गावातील ५८ हजार ८०९ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. आजवर ४४ गावांतील पंचनामे पूर्ण झाले. यात ३० हजार ५८१ हे. क्षेत्रातील २३ हजार ३८६ शेतकऱ्यांना ३३ टक्क्यांपेक्षा अधिक फटका बसला आहे. उर्वरित ५७ गावांतील पंचनामे करण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण होणार असून, अंतिम अहवाल त्यानंतर समोर येईल. -सतीश सोनी, तहसीलदार जाफराबाद
घास हिरावून घेतलाशेतकऱ्यांनी केलेला खर्च पाण्यात गेला असून, तोंडचा घास हिरावून घेतल्याने दिवाळीसुद्धा साजरी करता आली नाही. त्यामुळे शासनाने सरसगट जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करावी. - कृष्णा मोरे, शेतकरी, नळविहरा