जालना : नमुना नंबर ८ मध्ये नोंद करण्यासाठी जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथील ग्रामसेविकेस १२ हजारांची लाच घेतांना लाच लुचपत विभागाने मंगळवारी (दि.२८ ) पकडले. मंजुषा गोविंद जगधने (३२, रा. रामनगर पोलीस कॉलनी जालना) असे ग्रामसेविकेचे नाव आहे. दरम्यान, मागील वीस दिवसांमध्ये जिल्ह्यातील तीन ग्रामसेवकांना लाच लुचपत विभागाने पकडले आहे.
तक्रारदारांनी जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथे १९२० चौरस फुटाची जागा नोटरीद्वारे खरेदी केलेली होती. सदर जागा नावे करण्यासाठी व नमूद जागेची ग्रामपंचायतला नोंद घेवून तसा नमुना नंबर ८ चा उतारा देण्यासाठी तक्रारदारांनी ग्रामसेविका जगधने यांच्याकडे कागदपत्रे देऊन त्यांना नमुना नंबर ८ मध्ये नोंद घेण्यासाठी विचारणा केली असता, त्यावेळी ग्रामसेविका जगधने यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली. ८ मे रोजी ग्रामसेविका जगधने यांच्या राहत्या घरी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, ग्रामसेविका जगधने व खाजगी इसम कांता टोपे यांनी पंचासमक्ष तडजोडअंती १२ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक रविंद्र निकाळजे, पोनि. काशिद, पोनि. व्हि. एल. चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, सचिन राऊत यांनी केली.