जालना : वाशिम येथील दोन दरोडेखोरांना मौजपुरी पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे, तर तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. ही कारवाई जालना तालुक्यातील सावरगाव हडप येथे गुरुवारी रात्री करण्यात आली. विशाल कालवल्या चव्हाण, गणेश नितीन चव्हाण (दोघे रा. वाशिम) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
मौजपुरी पोलिस ठाण्याचे सपोनि. मिथुन घुगे, पोउपनि. नेटके, प्रदीप प्राचरणे, धोंडीराम वाघमारे हे गुरुवारी रात्री मौजपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. सावरगाव हडप येथे काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सावरगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेतला असता, पाचही जण दुचाकीवर बसून पळून जात होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर तीन जण पळून गेले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. मिथुन घुगे, पोउपनि. राजेश नेटके, अविनाश मांटे, प्रदीप पाचरणे, धोंडीराम वाघमारे, सदाशिव खैरे यांनी केली आहे.
एका आरोपीवर १२ गुन्हेयातील विशाल चव्हाण याच्यावर वाशिम जिल्ह्यात चोरी, चोरीचा प्रयत्न, घरफोडी, खुनासह दरोडा अशा प्रकारचे १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून इतर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पाचही जणांविरुद्ध मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.