जालना - राज्य सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांना मुलाखती देत आहेत. या मुलाखतीत खोटी आकडेवारी देऊन ते राज्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. मुंबईतल्या वातानुकुलीत कार्यालयात बसून मुख्यमंत्र्यांना दुष्काळाची दाहकता माहिती नाही. त्यांनी मराठवाड्यात येऊन पहावे. म्हणजे त्यांना दुष्काळाची तीव्रता समजेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. तर, गेल्या चार वर्षात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा जालना शहरात पोहोचली. जालना शहरात झालेल्या विशाल जनसंघर्ष सभेला मार्गदर्शन करताना खा. अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. धोंडीराम राठोड, नारायणराव मुंडे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनावणे, रामकिसन ओझा, कल्याण दळे, प्रदेश चिटणीस बाबुराव कुलकर्णी, सत्संग मुंडे, विजयकुमार कामठ, भिमराव डोंगरे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, विजयकुमार कामड, राजेश राठोड, राजेंद्र राख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाने जालना शहराचा व जिल्ह्याचा विकास केला. पण भाजपचे सरकार आल्यापासून जालन्याच्या विकासाला खीळ बसली आहे. राज्य सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. या चार वर्षात राज्यातील प्रश्न सुटण्याऐवजी अधिक किचकट झाले आहेत. गेल्या चार वर्षात घोषणा आणि भाषणे करण्यापलिकडे काहीही केले नाही. चार वर्षात सोळा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांची मुलेही आत्महत्या करू लागली आहेत. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण, अद्याप शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. शेतकरी, कष्टकरी, तरूण विद्यार्थी, महिला या सर्व समाजघटकांची फसवणूक सरकारने केली आहे. राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप आहे पण सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री खोटे बोलून जनतेची फसवणूक करत आहेत.
जलयुक्त शिवार योजनेमुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा मुख्यमंत्री करित आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या सरकारच्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार राज्याच्या अनेक तालुक्यात भूजल पातळीत दोन ते तीन मीटरने घट झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेतून जनतेचे नाही तर सत्ताधारी भाजप शिवसेना नेत्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. जलयुक्त शिवार योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात बालमृत्यू आणि मातामृत्यू कमी झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. पण राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या आकडेवारीने मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा होता हे सिध्द केले आहे. गेल्या तीन वर्षात राज्यात ८० हजार बाल व मातामृत्यू झाले आहेत. हा आकडा मुख्यमंत्र्यांना कमी वाटतो का?असा संतप्त सवाल करून मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा करावा, म्हणजे त्यांना खरी परिस्थिती दिसेल असे खा चव्हाण म्हणाले.
इंधनाचे दर वाढवून लोकांची लुट सुरु आहे आणि पंतप्रधान प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वतःचा हसरा फोटो लावून बघा मी तुम्हाला कसे उल्लू बनवले म्हणून खिजवत आहेत. पुन्हा भाजपचे सरकार आले तर इंधनाचे दर इतके वाढतील की लोकांना बैलगाडीतून फिरावे लागेल. काँग्रेस पक्षाने लोकशाही व संविधानाचे रक्षण केले मात्र भाजपचे मंत्री संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. मोदी आणि फडणवीस हुकुमशाही पध्दतीने कारभार करत आहेत. व्यापा-यांना धमकावले जात आहे. सुशिक्षित बेरोजगारांना पकोडे विकण्यास सांगून पंतप्रधान त्यांचा अवमान करत आहेत. महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाजपचे नेते महिलांवर अत्याचार करित आहेत. भाजपचे आमदार मुलींना पळवून नेण्याची भाषा करतात तरीही भाजप त्यांच्यावर कारवाई करत नाही, अशी चौफेर टीका करून खा. अशोक चव्हाण यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा पंचनामा केला.
जालना येथील या सभेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या सुराज्य यात्रेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राज्यात केवळ कुराज्य असताना सुराज्य यात्रा काढताना सरकारला लाज कशी वाटत नाही. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले. राफेल विमान खरेदीत झालेल्या घोटाळ्याची विस्तृत माहिती देऊन या गंभीर प्रकरणाबाबत पंतप्रधान मौन धारण कसे बसू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.