बदनापूर ( जालना) : पावसाने झालेल्या नुकसानीचे येत्या पंधरा दिवसात पंचनामे होतील. त्यानंतर मदतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. सरसकट पंचनामे सारखे नुकसान दिसत नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले
अतिवृष्टी झालेल्या बदनापूर तालुक्यातील अंबडगाव शिवारात आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट दिली. येथे दत्तू रावसाहेब गोजे या शेतकऱ्याच्या गट क्रमांक 53 मध्ये नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून या भागात नेहमीच अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याचे कारण शोधण्यासाठी एका समितीची गरज आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे वेगवेगळे भाग आहेत. तरीही ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे पंधरा दिवसापर्यंत करण्यात येतील. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत निर्णय घेतील. सरसकट पंचनामे सारखे नुकसान दिसत नाही परंतु नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय व मदत निश्चित मिळेल. फळबागांचे सुद्धा पंचनामे होतील. पिक विमा कंपन्यांना यामध्ये जोडण्यात येणार असून लवकरच संयुक्त पंचनामे करण्यात येतील, असे आश्वासन सत्तार यांनी दिले.
यावेळी माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, खोतकर राजेश, महादू जऱ्हाड, गीते निवृत्ती, डाके नंदकिशोर, दाभाडे श्रीरंग, जऱ्हाड ताराचंद, फुलमाळी शिवाजी, जऱ्हाड भगवान, म्हात्रे संतोष, वरकड बाबुराव, मिर्झा शेख अजीज, कोल्हे जगदीश आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी अंबडगाव, धोपटेश्वर, देवगाव कस्तुरवाडी व रोशनगाव मंडळातील पिकांची हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये फळबाग, कापूस, सोयाबीन, तूर अशा अनेक पिकांचे नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन कृषिमंत्र्यांना दिले.