जालना : नागरिकांची फसवणूक झालेल्या ८ पैकी ७ प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून कासवगतीने होत आहे. यात व्हाईट कॉलर आरोपी असल्यामुळे ते सापडत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीच सापडले नसल्यामुळे २०२० मध्ये ८ पैकी एका गुन्ह्याचे दोषारोपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीची तक्रार असल्यास त्या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येतो. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हे पोलीस अधीक्षकांना रिपोर्ट करतात. २०२० मध्ये जालना जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविलेल्या गुन्ह्यांपैकी ८ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रभारी पोलीस उपअधीक्षक शालिनी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत असतात. मोठ्या रकमेची फसवणूक करणारे आरोपीही व्हाईट कॉलर असतात, अशा आरोपींना अटक करणे, फसवणूक करून मिळविलेल्या पैशांतून आरोपींनी संपत्ती खरेदी केली असेल तर ती संपत्ती जप्त करण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करणे, बॅंक खाती गोठविणे, आरोपींविरुध्द तपास करून त्यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल करणे, हे आर्थिक गुन्हे शाखेकडून केले जाते. परंतु, आर्थिक गुन्हे शाखेकडून बहुतेक गुन्ह्यांचा तपास कासवगतीने केला जात असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
माझ्याकडे आठ दिवसांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार आला आहे. आर्थिक गुन्ह्यांचा तपास अत्यंत किचकट असतो. या गुन्ह्यात कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. तज्ज्ञांचा अभिप्राय द्यावा लागतो. यामुळे दोषारोपत्र दाखल करण्यास उशीर होतो.
शालिनी नाईक, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालना
मैत्रीचा घोटाळा गाजला
नागरिकांना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून मैत्री या कंपनीने २०१६ मध्ये जिल्ह्यातील तब्बल १३ हजार नागरिकांची फसवणूक केली होती. हा घोटाळा तब्बल २४ करोड रुपयांचा असून, यातील आरोपी अद्यापही मोकाटच आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांना अद्यापही मोबदला मिळाला नाही.
घोटकेश्वर संस्थेकडून फसवणूक
जालना शहरातील घोटकेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने तब्बल २३ जणांची फसवणूक केली होती. जवळपास २३ लाख रुपयांची ही फसवणूक झाली होती. यातील आरोपीही मोकाटच असल्याचे पोलिसांनी सांगितले.