लोकमत न्यूज नेटवर्क । जालना । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जालना लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून २० उमेदवार नशीब आजमावत असून, त्यात भाजपाचे रावसाहेब दानवे, काँग्रेसचे विलास औताडे, वंचित आघाडीचे शरदचंद्र वानखेडे हे देखील रिंगणात आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून, सायंकाळी ६ वाजता मतदान पूर्ण होईल. असे असले तरी, सायंकाळी सहा वाजेपर्यंत जेवढे मतदार रांगेत असतील त्यांना टोकन देण्यात येणार आहे. टोकन असलेल्यांनाच सायंकाळी सहानंतर मतदान करता येणार आहे. एकूणच निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.मतदारांसाठी २०५८ व्हीव्हीपॅटलोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच दोन हजार ०५८ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.१६८ केंद्रांतून होणार लाईव्ह कास्टजालना लोकसभा क्षेत्रातील एकूण मतदान केंद्रापैकी १६८ केंद्रातील मतदान प्रक्रिया थेट लाईव्ह बेव कास्ट करण्यात येणार आहे. या केंद्रातील हालचालींवर निवडणूक आयोग थेट लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे, सदर लाईव्ह कॉस्ट केवळ निवडणूक विभागच बघू शकणार आहे.
जालन्याचा खासदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:56 AM