जालना : स्वच्छ शहर, सुंदर शहरासाठी नगरपालिका प्रयत्न करीत आहे. परंतु, दुसरीकडे शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत भागात अनेक जण अनधिकृत डिजिटल फलक लावत आहेत. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून, पालिकेला मिळणारा करही बुडीत जात आहे.
नगरपालिकेच्या हद्दीत डिजिटल होर्डिंग लावण्यासाठी पालिकेची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे. जेथे डिजिटल होर्डिंग लावले जाणार आहेत तेथे किती दिवस ते लागणार याचा उल्लेख करून पालिकेला कर भरणे गरजेचे असते. परंतु, शहरातील विविध भागांत अनेक जण अनधिकृतपणे डिजिटल होर्डिंग्ज लावत आहेत. अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालिकेकडूनही या अनधिकृत डिजिटलकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहराचे होणारे विद्रूपीकरण आणि बुडीत जाणारा कर पाहता पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
काय होऊ शकते कारवाई?
परवानगीशिवाय शहरात कोठेही डिजिटल होर्डिंग्ज लावता येत नाही.
अनधिकृत डिजिटल होर्डिंग्ज लावले असेल तर पालिका कारवाई करून सांगाड्यासह होर्डिंग्ज जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करते.
वेळोवेळी सूचना देऊनही अनधिकृत डिजिटल होर्डिंग्ज लावले जात असतील तर कायदेशीर कारवाईही नगरपालिका प्रशासन करू शकते.
या ठिकाणांकडे कोण लक्ष देणार?
जालना शहरातील औरंगाबाद चौफुली ते बसस्थानक व प्रमुख बाजारपेठेकडे जाणाऱ्या विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात डिजिटल होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
जुना जालना शहरातील गांधी चमन, शनी मंदिर परिसर ते नूतन वसाहत मार्गाकडे जाणाऱ्या परिसराचेही डिजिटल होर्डिंग्जमुळे विद्रूपीकरण झालेले आहे.
वरील प्रमुख मार्गांसह जालना शहरातील बाजारपेठा, अंतर्गत भागातील विविध ठिकाणीही अनधिकृतपणे डिजिटल होर्डिंग्ज लावण्यात येत आहेत.
वर्षभरापासून कारवाई नाही
शहरातील विविध भागांत डिजिटल फलक लावण्यासाठी नगरपालिकेची परवानगी गरजेची आहे. त्यानुसार पालिकेकडून सूचना दिल्या जातात.
मागील वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे डिजिटल होर्डिंग्ज लावण्याचे प्रमाण कमी झाले होते. या काळात कारवाईकडे दुर्लक्ष झाले.
सध्या बाजारपेठ पूर्णत: खुली झाली आहे. त्यामुळे डिजिटल होर्डिंग्ज लावणाऱ्यांची संख्या वाढली असून, अनधिकृत होर्डिंग्ज लागताना दिसत आहेत.
...तर कारवाई करू
अनधिकृत डिजिटल होर्डिंग्ज लावू नये, यासाठी संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. परवानगीधारकांकडून कर भरून घेतल्यानंतर त्यांना डिजिटल होर्डिंग्ज लावण्याची परवानगी दिली जाते. यापुढील काळात शहरातील अनधिकृत डिजिटलवर कारवाई केली जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.